लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दहिसरच्या टोल नाक्यावर गेल्या अनेक वर्षां पासून मीरा भाईंदरकरांना टोलचा भुर्दंड सोसावा लागत असून त्यातच आता टोल दरात वाढ केली आहे . मीरा भाईंदरकरांचा टोल रद्द करा अन्यथा नागरिकांसाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिला आहे . आ . जैन यांचा इशारा म्हणजे राज्य सरकारला घरचा आहेर मानला जात आहे .
मुंबईतील उडडाणपूल साठीचा खर्च वसूल करण्यासाठी दहिसरचा टोलनाका उभारण्यात आला आहे . पण जी बहुसंख्य लोकं उडडाणपूल वापरतात त्यांच्या कडून टोल न घेता मीरा भाईंदर मधून मुंबई उपनगरातील जवळच्या भागात जाणाऱ्या नागरिकां कडून टोल वसुली गेल्या अनेक वर्षां पासून केली जात आहे .
दहिसर टोल नाका हटवावा व मीरा भाईंदरच्या बाहेर न्यावा यासाठी आपण शासना कडे सतत पत्र व पाठपुरावा करत आहोत . येथे मोठी वाहतूक कोंडी होत असताना देखील टोल घेतल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नाहीत . पुलाखालून जवळच्या ठिकाणांना जाणाऱ्या प्रवाशांकडून देखील टोल आकारला जात आहे. हा नागरिकांवर होणारा अन्याय आहे असे आ. जैन म्हणाल्या.
आपले सासरे माजी खासदार मिठालाल जैन यांनी टोल स्थलांतरित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केले. पण राज्य पातळीवर काहीच कार्यवाही झाली नाही. टोल विरुद्ध आपण सुद्धा केंद्रीय आणि राज्य पातळीवर पत्रव्यवहार आणि चर्चा केली . टोलनाका हटला नाही त्यात आता टोल नाका येथे दरवाढ जाहीर झाल्याने वाहतूक कोंडीने आधीच त्रस्त नागरिकां मध्ये आक्रोश निर्माण झाला आहे असे त्या म्हणाल्या.
केंद्र आणि राज्य शासनाच्या टोल धोरणाचे उल्लंघन करून मीरा भाईंदरच्या जनते कडून टोल वसुली केली जात आहे . ३ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री दादासाहेब भुसे सह संबंधित सर्व वरिष्ठांना प्रत्यक्ष भेटून दहिसर टोल नाक्यावरील दरवाढ रद्द करा व मीरा भाईंदरच्या नागरिकांना टोलमुक्त करा अशी विनंती केली आहे . मुख्यमंत्री यांनी सकारात्मक उत्तर दिले असून लवकरात लवकर दहिसर टोल बाबत निर्णय न झाल्यास नागरिकांच्या न्याय हितासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. जैन यांनी दिला आहे.