Jayant Patil ( Marathi News ): शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. आज पुण्यात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आव्हाड यांची बाजू घेतली आहे.
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
"आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जयंत पाटलांची पोस्ट काय?
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात टीका सुरू आहेत. दरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. "जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही", असं जयंत पाटील पोस्टमध्ये म्हणाले.
"आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असंही पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे.
पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भीमराव बबन साठे (४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणावर सध्या राजकारण तापले आहे.