Jitendra Awhad ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. भाजपाने आज राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलने करुन गुन्हे दाखल केली आहेत. दरम्यान, यावर आता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"काल आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले, मला फाशी द्या. मी मनुवादी, मनुस्मृतीच्याविरोधात उभा राहणार आहे, मी मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे, असं स्पष्टच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. "माझ्या हातून चूक झाली त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची मी माफी मागितली. कोश्यारी महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते तेव्हा त्यांनी माफी मागितली होती का? चंद्रकांत पाटील ज्यावेळी शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलले होते तेव्हा त्यांनी माफी मागितली होती का? कोश्यारी यांनी जेव्हा ते वक्तव्य केलं, तेव्हा भाजपावाले त्यांना बोलायला गेली नाहीत, असा टोलाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला लगावला.
भाजपाचे आणि माझे वैचारिक मतभेद
"भाजपाचे आणि माझे वैचारिक मतभेद आहेत, मनुस्मृती, धर्म यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात वैचारिक मतभेद आहेत. पवार साहेबांची जी भूमिका आहे तिच भूमिका माझी आहे. मनुस्मृतीमध्ये मातेबद्दल वाईट लिहिले आहे त्यामुळे मनुस्मृती मला मान्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्ही काल गेल्यामुळे आम्हाला इतिहास कळाला. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना यांनी वाळीत टाकलं. ९७ वर्षानंतर पुन्हा त्याच जागी मनुस्मृती जाळण्यात आली. मला फाशी दिला दिली तरी मी मनुस्मृतीच्याविरोधाक उभा राहणार. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्याविरोधात राहणार आहे, असंही आव्हाड म्हणाले.
"माझ्याकडून काल अनावधानाने ही घटना घडली. कार्यक्रमाच्या शेवटी ही घटना घडली. माझ्यावर गुन्हे दाखल झाले, मी गुन्हे झेलायला तयार आहे. मला पुढे करुन मनुस्मृतीला लपवायचा प्रयत्न सुरू आहे, असंही आव्हाड म्हणाले.