मुंबई- शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध करत, विनोद तावडेंच्या घराबाहेर काळा आकाश कंदील लावला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याच्या शिक्षण धोरणाचा निषेध करण्यासाठी विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावला. तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावल्यानंतर कपिल पाटील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर काळा कंदिल लावण्यासाठी निघाले होते. पण त्यापूर्वीच पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं.
रात्रशाळा शिक्षकांना काढून रात्रीचं शिक्षण अंधारात लोटलं आहे. मुंबईतल्या शिक्षकांचे पगार दादागिरीने बुडणाऱ्या मुंबईत बँकेत ढकलले आहेत. पेन्शन नाही, भरती बंद आहे, विनाअनुदानित शिक्षकांचे हाल सुरु आहेत, चौकशांचा आणि बदल्यांचा ससेमिरा लावण्यात आला आहे, वेतनेतर अनुदान नाही, ऐन दिवाळीत राज्यातले हजारो शिक्षक पगाराविना आहेत. हे कमी की काय म्हणून स्टुडन्ट अपडेटच्या नावाखाली ऑनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना जुंपण्यात आलं आहे. राज्यातलं शिक्षण जवळपास बंद पडलं आहे. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशी राज्याची स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केली.