लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदनापूरचे (जि. जालना) भाजप आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर वेगळ्याच प्रकारे मात केली. म्हाडाच्या ताडदेव येथील एका इमारतीमधील साडेसात कोटींचे घर त्यांनी जिंकले. हे एकच घर आमदार-खासदार या वर्गवारीसाठी राखीव असल्याने राज्यमंत्री कराड यांना प्रतीक्षा यादीवर समाधान मानावे लागले.
म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची सोडत आज काढण्यात आली. या घरांमध्ये अल्प, उच्च आणि उच्च उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध होती. सर्वांत महागडी तीन घरे ताडदेव या उच्चभ्रू भागात क्रिसेंट टाॅवर या इमारतीत उपलब्ध होती. त्यातील एक घर आमदार-खासदार यांच्यासाठी राखीव होते. १४२.५० चौरस मीटर म्हणजे १५३३ चौरस फुटांच्या सुमारे ७.५८ कोटी रुपये किमतीच्या या घरासाठी राज्यमंत्री कराड आणि आ. कुचे यांनी अर्ज केला होता. आता हे घर कुचे यांनी नाकारले तरच ते कराड यांना प्रतीक्षा यादीत क्रमांक १ वर असल्याने मिळण्याची शक्यता आहे.
आ. कुचे प्रतिनिधित्व करत असलेला बदनापूर विधानसभा मतदारसंघ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करत असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि ते त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात.