सोमय्या, हा खरा हातोडा घ्या, राणेंचा बंगला पाडणार का सांगा?; शिवसेनेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:08 PM2022-09-20T19:08:21+5:302022-09-20T19:23:55+5:30
शिवसेना नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनीही टीका करत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना सवाल केला आहे.
मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील अधीश या बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर आहे. या बंगल्याचा अनधिकृत भाग दुसऱ्यांदा विचारात घेण्यात येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनीही टीका करत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना सवाल केला आहे.
''न्यायव्यवस्थेने सत्तेचा माज उतरवला आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग तोडण्याचा तसेच १० लाख रुपये दंड जमा करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करत आहे. न्यायव्यवस्थेने सत्तेजा माज उतरवला आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या जे थर्माकॉलचा हातोडा घेऊन गावोगावी जात असतात त्यांना मी खरा हातोडा देत आहे, आता हा खरा हातोडा घ्या आणि पहिला वार बंगल्यावर मारणार का असा सवाल मी त्यांना करत आहे, असं ट्विट आमदार मनीषा कायंदे यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन विरोधकांकडून आता नारायण राणे यांच्यावर टीका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनीही टीका केली आहे. सत्तेच्या अहंकाराला कायदा आणि न्यायव्यवस्थेपुढे नतमस्तक व्हावे लागते. नारायण राणेंच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग दोन आठवड्याच्या आत पाडण्याचा मुंबई उच्चन्यायाच्या निर्णयाचे स्वागत आहे. कायदा व न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही मोठे नाही. प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे, असं ट्विट क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे.
आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला
हायकोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैर आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नारायण राणे यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितल.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना...माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना तुम्ही जितका त्रास द्याल, त्यांना आई जगदंबा कधीही माफ करणार नाही. ती नक्की बदला घेते आणि आई जगदंबेने नारायण राणेंचा चांगला बदला घेतल्याचं चंदकांत खैरे यांनी सांगितलं.