मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा पक्षातून बाहेर पडल्यानंतर गोऱ्हेंवर ठाकरे गटातील नेत्यांनी सडकून टीका केली. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर निलम गोऱ्हेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पक्षातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना पत्रक पाठवले होते आणि त्यांनी रिप्लाय देखील दिला असल्याचे गोऱ्हेंनी सांगितले.
आता मातोश्रीवरून फोन आल्यास तिकडे जाणार का? असे विचारले असताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, "बोलावलं तर जाईन पण त्यांच्यात पक्षात जाणार नाही. मी राजीनामा दिल्यानंतरचे ते पत्रक उद्धव ठाकरेंना पाठवले होते. त्यावर त्यांनी नमस्कार आणि स्मायली पाठवून प्रतिक्रिया दिली. मी सोडून जाणार आहे याची त्यांना आधीच कुणकुण लागली होती असं मला वाटतं. त्यामुळे आठ-दिवस सतत फोन येत होते. मी त्यांना सांगितलं होतंं की जाताना सांगून जाईन पण न सांगता गेले आणि गेल्यानंतर त्यांना सांगितले."
ठाकरे गटात संवादाचा अभावउद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. निलम गोऱ्हे यांनी देखील याचाच दाखला देत ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे नमूद केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने संघटनेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. ते मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. म्हणूनच आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला असे गोऱ्हेंनी स्पष्ट केले.
संजय राऊतांचा बळी गेला - गोऱ्हेखासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना गोऱ्हे यांनी एक धक्कादायक विधान केले. "संजय राऊतांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी मला अनेकदा मदत केली पण सद्याच्या राजकारणामुळे त्यांचा बळी गेला. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. संजय राऊत यांनी टोकाचं बोलू नये, वैचारिक मांडणी करावी असे मला वाटते. पण काही लोक आक्रमक बोलू आणि लिहू शकत नाहीत ते राऊतांना हे करायला सांगतात पण त्यामुळे राऊतांना त्रास सहन करावा लागतो", असे गोऱ्हे यांनी आणखी सांगितले.