मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना आज चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
सदर घटनेनंतर संदीप देशपांडे यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे, नेते नितीन सरदेसाई विचारपूस करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संदीप देशपांडे यांची विचारपूस केली. तसेच योग्य ते उपचार झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सदर प्रकरणावरुन मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना मुंबई पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे आणि चौकशी करावी. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार संदीप देशपांडे बाहेर काढतायेत. आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करून त्यात तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. तर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी थेट युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले. संदीप देशपांडे गेल्या अनेक दिवसांपासून वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप करत होते. गेल्यावेळेचं सरकार असताना वरुण सरदेसाईंची काय ताकद होती, हे सगळ्यांनी पाहिलंय. एका पक्षाचा कार्यकर्ता एक प्रकरण उघड करत असताना त्याच्यावर हल्ला होतो. म्हणून वरुण सरदेसाईंसारख्या लोकांचं या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का?, याची तपासणी करा, अशी मागणी नितेश राणेंनी यावेळी केली.
दरम्यान, चौकशीसाठी पोलीस पथक संदीप देशपांडे यांच्या घरी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना फोन केला असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना दिलं.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यामुळे मी घाबरणार नाही. भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार. आम्ही कुणाला भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी म्हटलं. तर संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यातील गुन्हेगार तात्काळ सापडले पाहिजे. पोलिसांनी काम चोख करावं. हल्लेखोरांना अटक करणे आणि त्यांच्यमागे जे कुणी असतील त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. हे घडले त्याचा निषेध जेवढा करू तितका कमी आहे. मनसैनिक संतप्त आहेत. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असे होणे अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. कडक शासन झालेच पाहिजे असं मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटलं.