मुंबई- आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेने पक्ष संघटन वाढीसाठी व मोर्चेबांधणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेना मुंबईच्या विभाग क्रमांक २ आणि ३च्या संपर्कप्रमुखपदी आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांची नियुक्ती झाली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार-विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांची मुंबईच्या विभाग क्रमांक २ आणि ३ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्षा बंगल्यावर शिवसेना युवा नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना सदर नियुक्तीचे पत्र दिले.यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के,शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार व प्रसार कराल तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेवून काम कराल असा विश्वास बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांना दिलेल्या आपल्या पत्रात नमूद केले आहे.