ठाणे : स्मार्टसिटीच्या माध्यमातून ठाण्यात विविध प्रकल्प सुरु आहेत, परंतु त्यातील एकही प्रकल्प दिव्यात सुरु झालेला नाही. त्यामुळे दिव्याला अशा पध्दतीने साप्तन वागणुक का दिली जाते. असा सवाल उपस्थित करीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंगळवारी स्मार्टसिटीच्या सल्लागारांची बैठक घेण्यात आली. तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती प्रशासनाच्या वतीने सल्लगारांना देण्यात आली. कोणत्या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत सुरु आहे, कामांची गती कशी आहे, याविषयाची देखील माहिती देण्यात आली. तसेच याचे सादरीकरणही करण्यात आले आहे. आता या प्रकल्पातील हरकती आणि सुचना प्रशासनाच्या वतीने मागविण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता प्रकल्प सुरु होण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने अशा पध्दतीने हरकती आणि सुचना घेणे गरजेचे होते. परंतु उशिराने का होईना प्रशासनाला आता जाग आली असल्याचेही या बैठकीत दिसून आले आहे.दरम्यान स्मार्टसिटीच्या विविध प्रकल्पांवरुन सल्लागार समिती मधील सदस्यांनी आक्षेप घेतला असतांना मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांनी देखील आक्षेप घेतला आहे. स्मार्टसिटी अंतर्गत विविध प्रकल्पांची कामे ठाण्यात सुरु आहे. परंतु याच स्मार्टसिटीत दिवा देखील येतो, हे प्रशासन विसरले आहे का?, कदाचित त्यामुळेच दिव्यात स्मार्टसिटी अंतर्गत एकही प्रकल्प सुरु नाही, दिव्यात आजच्या घडीला असंख्य समस्या आहेत, रस्ते, पाणी, वीज, गटारे आदींसह इतर समस्याही भेडसावत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. दिव्याला अशा पध्दतीची वागणुक का? असा सवालही त्यांनी करुन ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे का दिसत नाही अशी टिका त्यांनी केली. त्यामुळे दिव्यातही स्मार्टसिटी अंतर्गत प्रकल्प हाती घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली.
ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:20 PM