मुंबई- गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण कोरोनाच्या छायेत अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी नवरात्र कुठल्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडीवर यावर्षी कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत गोविंदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाप्रताप सरनाईकांनी निवेदन पाठवले आहे. यामध्ये आमदार या नात्याने गेली अनेक वर्षे मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं.
बालगोपाळ, तरुण ते थोरामोठ्यां पर्यंत दहीहंडी लोकप्रिय सण असून तो महाराष्ट्रासह देशा विदेशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वसामान्यांना देखील उत्सवाचा आनंद लुटता येईल, असं प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या निवेदन पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच खासगी वाहनाने जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात टोलमाफी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.