Join us  

'अधिवेशन, हजारो लोक, कॅमेरे अन् खुलेआम...'; शिंदे-राज यांच्या भेटीवर सरनाईकांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 8:08 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर/मुंबई- आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी राज ठाकरे यांनी विधान भवनात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे विधानभवनात पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे  नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या अचानक झालेल्या भेटीवर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना राज ठाकरे हे भेटले असतील तर त्यात काहीही वावगं नाही, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांचा मोठा पक्ष आहे. किमयागार नेता म्हणून त्यांची देशात असल्याचं कौतुकही प्रताप सरनाईकांनी राज ठाकरेंचं केलं आहे. 

दोन मोठे नेते भेटतात, तेव्हा चहापानाचा कार्यक्रम होतो. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राज्याचे दोन नेते एकत्र आले. मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल, असं मला वाटतं नाही. तशी चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल. हजारो लोकं अधिवेशनात येतात. कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळं ते खुलेआम भेटल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंशी फारकत घेत बाळासाहेबांची शिवसेना हा नवा पक्ष काढला. त्यानंतर शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. त्यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंडखोरीनंतर पहिली भेट झाली होती. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा निघाला. त्यानंतर पुन्हा राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले. दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्या मनसेने आयोजित केलेल्या दिपोत्सव कार्यक्रमाचं उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यात आता पुन्हा राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेप्रताप सरनाईकमहाराष्ट्र सरकारमनसे