Join us

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:59 PM

मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत.

- अजय परचुरे

मुंबई - मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट करत राम कदम यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा चौफेर टीकेची झोड उठू लागली आहे.

सोशल मीडियावर ट्रोल, ट्विट केलं डिलीट

''हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोऴ्यांचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. यांचे अमेरिकेत निधन झाले आहे'', अशा आशयाचे ट्विट राम कदम यांनी केले होते. सोशल मीडियावर सडकून टीका झाल्यानंतर राम कदम यांनी ट्विट डिलीट केले. 

(... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम)

 

''गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रे यांच्याबाबतची अफवा पसरली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी व  प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो'', असे ट्विट करत राम कदम यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांना देत आहे.सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. ''सोनालीची प्रकृती चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे'', असे ट्विट त्यांनी केले होते.

मुली पळवण्याबाबतचं वादग्रस्त विधान

भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी (3 सप्टेंबर) घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहीहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

राम कदमांनी खेद व्यक्त केला

दरम्यान, लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे. 

 

'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?'

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहीकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदारानं तोडले अकलेचे तारे!', असे ट्विट करत  'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?', असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

 

 

टॅग्स :सोनाली बेंद्रेराम कदमबॉलिवूडट्विटर