राणांची दिलगिरी, कडू आज भूमिका जाहीर करणार; शिंदे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर समेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:15 AM2022-11-01T07:15:20+5:302022-11-01T07:16:04+5:30
कडू, राणा यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले.
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील दोन नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. कडू यांच्याविषयी केलेल्या विधानांबद्दल राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली.
कडू, राणा यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. दोन तास दोघांना घेऊन ते बसले. एकमेकांबद्दलची कटूता विसरून एकत्रित काम करा, असा सल्लाही दिला. कडू, राणा हे सोमवारी सकाळी सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. शिंदे, फडणवीस यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिली. कडू म्हणाले की, राणा यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय जाहीर करेन.
‘माझ्या एका कॉलवर कडू गुवाहाटीला गेले’
माझ्या एका फोन कॉलवर बच्चू कडू हे गुवाहाटीला शिंदे यांच्याकडे गेले होते, त्यामुळे त्यांनी सौदा केला वगैरे आरोप करणे चुकीचे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडूंविषयी भावना व्यक्त केल्या.