'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:16 PM2022-05-06T17:16:45+5:302022-05-06T18:28:00+5:30

रवी राणा यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

MLA Ravi Rana has again criticized CM Uddhav Thackeray and the state government | 'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल

'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Next

मुंबई- मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले. मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

नवनीत यांना भायखळा कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचात्रास आहे. त्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जमिनीवर बसावे आणि झोपावे लागत असल्यामुळे त्रास वाढल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केला आहे. 

रवी राणा यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कारागृह प्रशासन हे सरकारच्या अखत्यारित आहे. म्हणजेच सरकारनेच आमच्यावर कारवाई करुन कारागृहात पाठवलं. एका महिलेसोबत किती द्वेषाचं राजकारण केलं गेलं, किती अपमानित केलं गेलं, हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आहे, असं रवी राणा म्हणाले. त्यामुळे बजरंग भक्त आणि राम भक्त आगामी काळात त्यांना नक्की धडा शिकवतील, असं रवी राणा यांनी सांगितलं. 

...आणि रडू कोसळले-

मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार रवी राणा यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा नवनीत यांना रडू कोसळले.

शिवसेना कार्यालयात युवा स्वाभिमानकडून तोडफोड-

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना ११ दिवसांनंतर जामीन मिळाल्याच्या आनंदात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री राजापेठ येथील शिवसेना कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर राणांचा जयघोष करून शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी केली. युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४५२, १४३, १४७, १४८, १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

अभिजीत देशमुख, अनुप अग्रवाल, अनिकेत देशमुख, मंगेश कोकाटे,  सत्यम राऊत यांना अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याच्या सुटकेमुळे पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पक्ष व शिवसैनिक अशी धुमश्चक्री उडाली आहे. दरम्यान, युवा स्वाभिमानचे हल्लेखोर कार्यालय पेटविण्याच्या हेतूने पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

Web Title: MLA Ravi Rana has again criticized CM Uddhav Thackeray and the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.