मुंबई- शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. अनिल परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अनिल परब यांच्यामुळे अंधारात गेली. मराठी माणासाच्या टाळूवरचं लोणी खाणारे अनिल परब लवकरच गजाआड होतील, अशी टीका रणी राणा यांनी केली आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.
अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा- किरीट सोमय्या
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनीही तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा, असा खोचक सल्ला देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.