मुंबई- मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.
डोक्यावरच्या टोपीचा अन् अंत:करणाच्या रंगात काहीही फरक नाही; शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा
अपक्ष आमदार रवी राणा यांनी मात्र राज्यपालांची बाजू मांडत त्यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे विधान केलंय त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असं आवाहन रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणा पुढे म्हणाले की, राज्यपालांनी सदर विधान भौगोलिक दृष्टीने केलं असावं. मुंबईत अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे मुंबईचा विकास करण्याच सर्वांचा हातभार आहे. मी सर्वांची आहे, असं म्हणत रवी राणा यांनी भगत सिंह कोश्यारींच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, असं राज्यपाल म्हणाले. आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांचे टोचले कान-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असतं. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.