आमदार रवींद्र वायकरांनी मागितली महिनाभराची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:11 AM2024-01-18T06:11:54+5:302024-01-18T06:12:28+5:30
या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.
मुंबई : जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १७ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. याउलट चौकशीस हजर राहण्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ दिली किंवा कसे याची माहिती ईडीकडून प्राप्त झाली नाही.
या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.
प्रकरण काय?
जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महानगरपालिकेत कार्यरत सब-इंजिनीअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करीत आहे. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने या
हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे.