Join us

'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 12:49 PM

लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काल 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे' आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचानालयाने (ED) ने कारवाई केली.

Rohit Pawar ( Marathi News )  : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काल 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे' आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचानालयाने (ED) ने कारवाई केली. बारामती अँग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर आता आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  

रोहित पवार यांनी ट्विट करुन टीका केली. " युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का?, असा टोला अजित पवार यांना ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एखादा युवक संविधानाच्या चौकटीत..."

"माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय.., असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

"हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. 

बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना जप्त

औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्याची यंत्रणा, जमीन, इमारत, अन्य साहित्य ईडीकडून जप्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने कन्नड साखर कारखाना खरेदी केली होता. ईडीने काही महिन्यांंपूर्वी बारामती ॲग्रो कंपनीच्या बारामती आणि पुणे कार्यालयात छापे टाकून कारवाई केली होती. त्यानंतर ईडीच्या मुंबई कार्यालयात रोहित पवार यांची चौकशी करण्यात आली होती. रोहित पवार यांनी बारामती ॲग्रो कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखाना खरेदी केला होता. कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट होती. पवार यांच्या कंपनीने बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लाॅन्ड्रिंग) करून कारखाना खरेदी केल्याच्या आरोपावरून ईडीने ही कारवाई केली.

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारदेवेंद्र फडणवीसअंमलबजावणी संचालनालय