मनसेच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचं राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र
By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 09:59 AM2021-01-15T09:59:46+5:302021-01-15T10:03:13+5:30
त्याचसोबत 'टेस्ला'सारख्या कंपनीने राज्यात गुंतवणूक केल्यास रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे
मुंबई – दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार उत्पादन करणाऱ्या टेस्ला कंपनीनं भारतात एन्ट्री घेतली आहे. टेस्लाने काही दिवसांपूर्वी याबाबत अधिकृतपणे घोषणा केली. त्यामुळे यापुढे टेस्लाच्या इलेक्ट्रीक कार भारताच्या रस्त्यांवर धावणार आहेत, परंतु या टेस्लानं रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट( R & D) युनिटसाठी कर्नाटकात नोंदणी केल्यानं विरोधकांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.
टेस्लासारखी कंपनी राज्यात आल्यानंतर अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत, परंतु टेस्ला कंपनी कर्नाटकला गेली, पेज ३ मंत्र्यांना झटका असं म्हणत बोलाची कढी बोलाचा भात असा टोला मनसेने आदित्य ठाकरेंना लगावला होता. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून टेस्ला कंपनीचा प्लांट राज्यात आणण्यासाठी मागणी केली आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, पर्यावरणपूरक ई-वाहनांची निर्मिती करणाऱ्या 'टेस्ला' या बहुराष्ट्रीय कंपनीने R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती देत तिथं नोंदणी केलीय. मात्र कंपनीच्या नियोजित प्लॅननुसार ते महाराष्ट्रात प्लांट सुरु करण्याबाबत सकारात्मक आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे हेही टेस्ला कंपनीला राज्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करतायेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन 'टेस्ला'चा प्लांट लवकरच राज्यात सुरु होईल, असा विश्वास वाटतो.
त्याचसोबत 'टेस्ला'सारख्या कंपनीने राज्यात गुंतवणूक केल्यास रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळं 'टेस्ला' कंपनीला लागणाऱ्या विविध परवानग्या देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने स्वतंत्र व्यवस्था सुरु केल्यास ते कंपनीसाठीही सोयीस्कर ठरेल. त्यासाठी एखादा डेस्क सुरू करण्याची विनंती मी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलीय. तसंच या डेस्कची जबाबदारी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याकडं सोपवल्यास अधिक गतीने काम होईल असंही रोहित पवारांनी सांगितले.
याशिवाय इतरही कंपन्यांनीही राज्यात गुंतवणूक करावी यासाठीही महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहेत. त्याकरिता महाविकास आघाडी सरकारने एक समिती गठीत केली असून ती या कंपन्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळं पुढील काळात वाहन निर्मितीबरोबर इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्या गुंतवणुकीसाठी राज्याला पसंती देतील आणि या माध्यमातून महाराष्ट्र हे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात देशातील एक महत्त्वाचं केंद्र ठरेल,असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.
गडकरींनी केले होते सुतोवाच
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले होते. अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबरोबर आपल्या कामकाजाला सुरुवात करेल. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनानंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर पुढील पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही गडकरी यांनी म्हटले होते.