Rohit Pawar ( Marathi News) : गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. यावरुन आता शरद पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन आव्हाड यांची बाजू घेत एक भीती व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
"ज्यांच्या नसानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, त्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तत्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केलं. पण पोर्शे कार अपघातात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन केलं जातंय, असा आरोप दावा आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये केला आहे.
"भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का?, असा सवालही आमदार रोहित पवार यांनी भाजपाला केला.
आव्हाडांवर गुन्हा दाखल
फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भीमराव बबन साठे (४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत.