मनसेच्या स्टेजवर आमदार सदा सरवणकर दिसले; दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 06:31 AM2022-09-10T06:31:33+5:302022-09-10T06:32:05+5:30

अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट घेतली होती.

MLA Sada Saravankar appeared on MNS stage; Shiv Sena and Shinde factions clashed in Dadar | मनसेच्या स्टेजवर आमदार सदा सरवणकर दिसले; दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट भिडले

मनसेच्या स्टेजवर आमदार सदा सरवणकर दिसले; दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट भिडले

Next

मुंबई - खरी शिवसेना कुणाची असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात निर्माण झाला असून त्याचे पडसाद गणेशोत्सवातही पाहायला मिळाले. गणेश विसर्जनावेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला होता. दादरमध्ये शिवसेनेचे संजय भगत आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर हे एकमेकांसमोर आल्यानंतर दोन्हीबाजूने घोषणाबाजी झाली. 

याचवेळी प्रभादेवी येथे मनसेने उभारलेल्या स्टेजवर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर आमदार सदा सरवणकर हजर होते. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचं चित्रही दादरमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

शिवसेना-शिंदे गटात राडा 
प्रभादेवीत शिवसेनेचे संजय भगत आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर आमनेसामने आले. त्यावेळी समाधान सरवणकरांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदेचे पुढे घेऊन जात आहे. पुढच्या वर्षीही याच जल्लोषात हिंदु सण साजरे करणार असं म्हणत म्याव म्याव घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रभादेवी परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मनसेच्या स्टेजवर असणारे आमदार सदा सरवणकर म्हणाले की, गणेशोत्सवात सगळीकडे हिंदुत्वाचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट आणि मनसे एकत्र दिसत आहेत. त्यामुळे गणेश विर्सजनाच्या स्टेजवर आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी 
अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात काहीवेळ गप्पाही रंगल्या. यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार, खासदार यांच्यात भेट झाली. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: MLA Sada Saravankar appeared on MNS stage; Shiv Sena and Shinde factions clashed in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.