उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:22 PM2024-10-23T15:22:26+5:302024-10-23T15:47:04+5:30

Sada Sarvankar : विधानसभा निवडणुकीमध्ये मीच बाजी मारेल असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.

MLA Sada Saravankar criticized Amit Thackeray's candidature | उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."

उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."

Mahim Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. माहिममध्ये मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने याच मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटानेही या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. दुसरीकडे, उमेदवारी मिळाल्यानंतर माहीमचा आमदार झाल्यावर या मतदारसंघासाठी काही दिवस राखून ठेवेन, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं. याविषयी बोलताना सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंऐवजी कार्यकर्त्याला उमेदवारी मिळालया हवी होती असे म्हटलं आहे.

माहीम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात आता अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत होणार आहे. लोकांसाठी एक दिवस पुरेसा नसतो तर माहिमकरांसाठी आम्ही २४ तास ३६५ दिवस उपलब्ध असतो असा टोला सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंना लगावला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही, त्यामुळे आता माघार घेणार नाही आणि निवडणुकीमध्ये मीच बाजी मारेल असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.

"तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार राहिलेलो आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक घरात, चाळीत आणि इमारतीत जनसंपर्क आहे. त्यामुळे लोक मला या लढाईत निश्चित विजयी करतील," असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.

"ठाकरे कुटुंबातील कुठलीही व्यक्ती निवडणुकीला उभी राहत नव्हती अशी प्रथा शिवसेना प्रमुखांनी आखून दिली होती. मध्यतरीच्या काळात शिवसेना प्रमुखांच्या  ध्येयामध्ये खंड पडला आणि एक ठाकरे आले. त्यानंतर आता अमित ठाकरे आले आहेत. लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अमित ठाकरेंऐवजी एखाद्या वर्षानुवर्षे पक्षाचे काम केलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती. पण तसे न होता मनसे प्रमुखांचे चिरंजीव आले. ही एक रंगतदार लढाई होणार आहे," असे सदा सरवणकर म्हणाले.

"गेली ३० ते ३५ वर्षे माहीम दादरमधल्या जनतेने मला निवडून दिलं आहे. एकच दिवस नाही तर सातत्याने सात दिवस आणि वर्षातले ३६५ दिवस मी लोकांसाठी उपलब्ध असतो. वर्षाचे ३६५ दिवस रात्रंदिवस कोणी मला गरजवंत फोन करतो तेव्हा मी त्यांच्याकडे जातो आणि त्यांचे प्रश्न सोडवतो. लोकांना रोजच्या रोज भेटणे हा आमचा दिनक्रम आहे. मतदारसंघात साडेचार लाख मतदार आहेत. त्यामुळे लोकांसाठी एक दिवस पुरेसा होणार नाही. ३६५ दिवस कमी पडतात," असा टोला सदा सरवणकर यांनी लगावला.
 

Web Title: MLA Sada Saravankar criticized Amit Thackeray's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.