‘ती’ गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच; बॅलेस्टिक अहवालातून झाली बाब उघड, अडचणीत होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:17 AM2023-01-12T07:17:39+5:302023-01-12T07:25:14+5:30
गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर दादर पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात ‘ती’ गोळी आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे.
गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात १५ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. यामध्ये पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीदरम्यान सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली. पुढे हाच मुद्दा घेऊन त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी वाढली. याप्रकरणी पोलिसांनी सरवणकर यांच्यासहित इतर लोकांविरोधात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.
घटनास्थळावरून जप्त केले काडतूस आणि सरवणकर यांची जप्त केलेली परवानाधारी रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांकडून तपास सुरू झाला.
निष्काळजीपणाचा ठपका?
या प्रकरणात समोर आलेल्या बॅलेस्टिक अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेली काडतुसे आणि बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे ती गोळी त्यांच्याच बंदुकीतून सुटल्याचे स्पष्ट झाले आहेत. याबाबत दादर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, सरवणकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका बसू शकतो. त्यानुसार, पोलिसांच्या हालचाली सुरू आहे.
अहवालाबाबत माहिती नाही
याबाबत सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता या अहवालाबाबत काही माहिती नसून, अधिक चौकशी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.