Join us

'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:29 PM

Siddhivinayak Mandir Prasad Row: मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या लाडू प्रसादात उंदराची पिल्लं आढळून आल्याचे आरोप मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी फेटाळून लावले आहेत.

मुंबई

मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Mandir) लाडू प्रसादात उंदराची पिल्लं आढळून आल्याचे आरोप मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियात व्हायरल झालेले व्हिडिओ मंदिर न्यासाच्या प्रसादाचे नाहीत. हे कुणाचं तरी षडयंत्र आहे. ज्या ठिकाणी प्रसाद तयार केला जातो तिथे पूर्णपणे स्वच्छता आहे. मी स्वत: काही दिवसांपूर्वी प्रसादालयाची पाहणी केली होती. व्हायरल व्हिडिओत कुठला तरी उकिरडा दिसत आहे. ती मंदिराची जागा वाटत नाही, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. 

सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू उंदिरांनी कुरतडल्याचा दावा करणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. प्रसादाच्या एका क्रेटमध्ये लाडू प्रसादाची पाकीटं आणि त्यावर उंदरांची काही पिल्लं आढळून आल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता. 

सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून याप्रकरणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात आमदार सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. "तो व्हिडिओ आमचा नाहीच. हे कुणाचं तरी षडयंत्र आहे. व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय ते प्लास्टिकमध्ये बंद असं दिसंतय. म्हणजे ते कुणीतरी कुठेतरी ठेवल्यासारखं आहे. हे कुणी का केलं माहित नाही. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या प्रसादालयात पूर्णपणे स्वच्छता आहे. त्याची पाहणीही मी केली होती. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीही माझ्यासोबत होते. या व्हिडिओमध्ये कुठला तरी उकिरड्यासारखा परिसर दिसतोय. पण मंदिराच्या प्रसादालयात उत्तम स्वच्छता आहे", असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबईसदा सरवणकर