मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 04:52 PM2022-09-11T16:52:31+5:302022-09-11T17:17:31+5:30

सुनिल शिंदे यांच्या आरोपानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं.

MLA Sada Saravankar said that they are trying to defame me because I went with CM Eknath Shinde | मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

Next

मुंबई- मुंबईतील प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. 

शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर करून धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असता. सत्तेचा माज किती झालाय हे या घटनांवरून दिसून येतेय असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी केला आहे. 

सुनिल शिंदे यांच्या आरोपानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असंही सदा सरवणकरांनी सांगितलं.

मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. मी कामं करून आमदार झालो आहे, असं सदा सरवणकर म्हणाले. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते  तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. सोशल मीडियाला सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. घरी जाऊन मारहाण करणं योग्य नाही, असंही सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

...तर खरी शिवसेना दाखवून देऊ- खासदार अरविंद सावंत

सदर प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. तसेच योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला. तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असा सवाल अरविंद सावतं यांनी उपस्थित केला. शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जातेय, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.

एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात- संतोष तेलवणे

सदर प्रकरणाबाबत शिंदे गटातील संतोष तेलवणे म्हणाले की, मी इमारतीखाली उभे असताना ५० जण माझ्यासमोर आले आणि माझ्याशी वाद घातला. मी एकटा त्यांना पुरेसा होतो. हात लावायचं तर ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हाला एकेएकेला घरातून उचलून मारेन. आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पूर्वीची शिवसेना राहिला नाही. आधी १-२ जण मारायला जायचे आता एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं. 

Web Title: MLA Sada Saravankar said that they are trying to defame me because I went with CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.