सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकरांची नियुक्ती, आदेश बांदेकरांना हटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:30 PM2023-11-07T13:30:58+5:302023-11-07T13:31:39+5:30
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना हटवून सदा सरवणकर यांना न्यासाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. सरवणकर यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. गणेशोत्सवाच्या काळात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राडा यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण आता सरवणकरांना सिद्धिविनायक न्यासाचं अध्यक्षपद देऊन शिंदेंनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.
गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची कास धरली.
आधी सरवणकरांचं तिकीट बांदेकरांना दिलं होतं...
सदा सरवणकर १९९२ ते २००७ पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. पण २००९ मध्ये सदा सरवणकरांना तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी नाराज सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत १००९ ची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली होती. त्यानंतर २०१२ मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. २०१४ मध्ये आणि त्यानंतर २०१९ मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले.