Join us

तपास यंत्रणेवर दबाव टाकणे 'गैर'; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 4:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी पाटील यांना आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आयएल अँड एफएसच्या कोहिनूर सीटीएनएल मधील गुंतवणुकीसंदर्भात ही चौकशी होते आहे. कोहिनूर सीटीएनएलतर्फे मुंबईतल्या दादर इथे कोहिनूर स्क्वेअरची उभारणी सुरू आहे. ईडीने यासंदर्भात २०१९मध्ये तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरनंतर ईडीने तपास हाती घेतला.

ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरात असलेल्या या कार्यलयाबाहेर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचदरम्यान शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील ईडीच्या चौकशीवर भाष्य केलं आहे. 

एखाद्याला ईडीची नोटीस आली तर त्याने शक्तिप्रदर्शन करणे, त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं चुकीचे आहे. ईडी, सीबीआय यांचा वापर राजकीय लोक करत असल्याचा काही लोकांचा गैरसमज झाला आहे. ईडीचा असा राजकीय वापर करायचाच असता तर अनेकजण आतमध्येच दिसले असते. बाहेर आलेच नसते, असं संजय शिरसाट म्हणाले. तसेच ईडीची नोटीस आली म्हणजे ताबडतोब शिक्षा होते अशातील भाग नाही. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली तर कारवाई करायची की नाही हे ईडी कार्यालय ठरवेल, असं संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले. 

नेमके प्रकरण काय?

आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. 

टॅग्स :जयंत पाटीलअंमलबजावणी संचालनालयसंजय शिरसाटराष्ट्रवादी काँग्रेस