Join us

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 9:11 AM

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपही मार्गी लागले. पण, बंडाच्या पहिल्या दिवसापासून सोबत असलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना काही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच औरंगाबादमधील एका जाहीर कार्यक्रमात आपली नाराजी बोलावून दाखवली आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे. मी मंत्री अतुल सावेंच्या वडिलांसोबत काम केले आहे. अतुल सावे राजकारणात येतील, असे वाटले नव्हते, पण ते आले. आमदार, राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्रीही झाले. जरा आमच्याकडेही पाहा. राजकारणात आता सिनिअर, ज्युनिअर राहिलंच नाही, अशी खंतही संजय शिरसाट यांनी खुद्द अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत व्यक्त केली.

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट हे लवकरच होणारे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. संजय शिरसाट उत्कृष्ठ आमदार आहेत. आमचे नेते आहेत. त्यांचा योग्य तो मान ठेवला जाणार आहे. मुळात अस्तित्वात असलेले मंत्री होते. त्यामुळे एक-दोनच जागा होत्या. मुख्यमंत्र्यांना देखील मर्यादा होत्या. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून नेत्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातून भाजपाचे नेते अतुल सावे, शिंदे गटातून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले. पण शिरसाट यांना मात्र मंत्रिपद मिळू शकले नाही. शिंदे सरकारकडून सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विस्तार होणार आहे. त्यावेळी आपल्याला मंत्रिपद दिलं जाणार असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे. 

टॅग्स :संजय शिरसाटएकनाथ शिंदेदीपक केसरकर महाराष्ट्र सरकार