Join us  

संतोष बांगर पुन्हा वादात, गावकरी अन् आमदारांच्या शिविगाळीचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:29 PM

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे

मुंबई/हिंगोली - शिवसेनेचे आमदाार आणि सध्या शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले. बंडखोर आमदारांनी परत फिरावे यासाठी आवाहन करताना ते रडले होते. मात्र, पुन्हा तेच बंडखोर आमदारांच्या ताफ्यात जाऊन बसले. त्यामुळे, सोशल मीडियात ते चांगलेच ट्रोल झाले, तर सातत्याने वादग्रस्त विधान आणि इतर वादांमुळेही ते चर्चेत असतात. आता, पुन्हा एकदा आमदार बांगर यांचा शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे. अडचण सांगताना संतोष बांगर त्यांना कोण आणि कुठून बोलता असा प्रश्न करतात. त्यावेळी, मी वसमत तालुक्यातील चिखली गावातून बोलत असल्याचे संबंधित व्यक्ती सांगतो. मला फायनान्स कंपन्यांचा त्रास सुरू असल्याचंही ते सांगतात. त्यानंतर, आमदार बांगर हे संबंधित व्यक्तीला संतोष बांगर यांचे निधन झाल्याचे स्वत:च सांगतात. त्यामुळे, ती व्यक्ती संतप्त होऊन शिवीगाळ करते, त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार बांगर हेही अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करतात. या दोघांमधील संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथर्मदर्शनी फोनवरील तो आवाज आमदार बांगर यांचाच असल्याचे व्हिडिओतून जाणवते. शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

संतोष बांगर यांचे यापूर्वीही मारहाण आणि फोनसंभाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका जत्रेत त्यांना गावकऱ्यांनी अडवले होते, तर मध्यान्ह भोजन योजनेतील एका कर्मचाऱ्याला त्यांनी कानाशिलात लगावल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यास मारहाण केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात २८ जानेवारीला पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी याबाबत फिर्याद दिली होती. 

टॅग्स :आमदारहिंगोलीशिवसेनासोशल व्हायरल