'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:59 AM2023-03-20T09:59:00+5:302023-03-20T10:01:28+5:30
शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले
मुंबई - हिंगोलीतीलआमदार संतोष बांगर यांचे एक वादग्रस्त फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे. अडचण सांगताना संतोष बांगर त्यांना कोण आणि कुठून बोलता असा प्रश्न करतात. काही वेळातच दोघांमध्ये शिवीगाळ सुरू होते. आता, याप्रकरणी आमदार बांगर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, ती ऑडिओ क्लीप माझी नसून फोन संभाषणातील व्यक्तीही मी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कुणीतरी माझा आवाज काढून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत आमदार बांगर यांनी अंग झटकलं.
शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले. बंडखोर आमदारांनी परत फिरावे यासाठी आवाहन करताना ते रडले होते. मात्र, पुन्हा तेच बंडखोर आमदारांच्या ताफ्यात जाऊन बसले. त्यामुळे, सोशल मीडियात ते चांगलेच ट्रोल झाले, तर सातत्याने वादग्रस्त विधान आणि इतर वादांमुळेही ते चर्चेत असतात. आता, पुन्हा एकदा आमदार बांगर यांचा शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात मोठे कलाकार आहेत, ते कुणाचाही आवाज काढू शकतात. त्यामुळे, मला बदनाम करण्यासाठी हा कुणीतरी डाव रचला आहे. तो आवाज माझा नसून माझा आवाज काढून ही शिवीगाळ करण्यात आलीय, असे आमदार बांगर यांनी स्पष्टीकरण देत ऑडिओ क्लीपप्रकरणी मौन सोडले.
काय आहे ऑडिओ प्रकरण
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे. अडचण सांगताना संतोष बांगर त्यांना कोण आणि कुठून बोलता असा प्रश्न करतात. त्यावेळी, मी वसमत तालुक्यातील चिखली गावातून बोलत असल्याचे संबंधित व्यक्ती सांगतो. मला फायनान्स कंपन्यांचा त्रास सुरू असल्याचंही ते सांगतात. त्यानंतर, आमदार बांगर हे संबंधित व्यक्तीला संतोष बांगर यांचे निधन झाल्याचे स्वत:च सांगतात. त्यामुळे, ती व्यक्ती संतप्त होऊन शिवीगाळ करते, त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार बांगर हेही अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करतात. या दोघांमधील संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथर्मदर्शनी फोनवरील तो आवाज आमदार बांगर यांचाच असल्याचे व्हिडिओतून जाणवते. शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, संतोष बांगर यांचे यापूर्वीही मारहाण आणि फोनसंभाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका जत्रेत त्यांना गावकऱ्यांनी अडवले होते, तर मध्यान्ह भोजन योजनेतील एका कर्मचाऱ्याला त्यांनी कानाशिलात लगावल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.