मुंबई : आपल्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश देत नसल्याने संतप्त झालेले एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलीस शिपायाला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.
आमदार बांगर गुरुवारी आपल्या २५ ते २७ कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवेशद्वारातून मंत्रालयात प्रवेश करीत होते. तेव्हा तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना अडवले. एवढ्या लोकांना पास अथवा पत्राशिवाय मंत्रालयात प्रवेश देता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. यामुळे संतप्त झालेल्या बांगर यांनी थेट एका पोलीस शिपायाला शिवीगाळ करीत दमदाटी केली. माझ्याकडे पिस्तूल असते, तर तुम्हाला गोळ्याच घातल्या असत्या, अशा प्रकारची धमकीही दिल्याचे समजते. याबाबत संबंधित पोलीस शिपायाने मंत्रालय पोलीस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये त्याची नोंद केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन केली चर्चा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी याबाबत तातडीने गृहविभागातील अधिकारी आणि आपल्या गटातील काही आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे आमदार बांगर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आपल्या स्वीय सहायकाने सर्व कार्यकर्त्यांची प्रवेशद्वारावर नोंद करूनच मंत्रालयात प्रवेश केल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले आहे.