मुंबई-
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याला विरोध करत आज मुंबईत आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. संतोष बांगर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. यावेळी भर पावसात संतोष बांगर यांनी समर्थकांना संबोधित केलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संतोष बांगर यांच्या समर्थकांची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली असताना एकनाथ शिंदेंनी मात्र संतोष बांगर हेच जिल्हाप्रमुख असल्याचं म्हणत त्यांचं पुनर्वसन केलं.
उद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई अमान्य! संतोष बांगर म्हणाले, “जिल्हाप्रमुख पदावरुन हटणार नाही”
"ज्या पद्धतीनं एका विचारानं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्व आमदारांनी वेगळी भूमिका घेतली. त्याच पद्धतीनं संतोष बांगर यांनाही ते विचार पटले आणि ते सोबत आले. ही केवळ राज्यात आणि देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात ऐतिहासिक घटना आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी सर्वजण एकत्र आले आहेत. संतोष बांगर यांच्यासाठी तुम्ही इथं आलात तसेच यापुढील काळातही असेच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहा. कोरोना काळात त्यांनी स्वत:ची बँक एफडी मोडून लोकांना मदत केली आहे. लोकांच्या सुख-दु:खात ते धावून जात असतात याची पूर्ण कल्पना मला आहे. त्यामुळे तेच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख आहेत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर बांगर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर
"शिवसेना संपवण्याचं काम गेल्या अडीच वर्षात होत होतं. पण आता एकटा एकनाथ शिंदे नव्हे तर तुम्ही सर्व मुख्यमंत्री आहात. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे एकाही शिवसैनिकाचा बाल बाका करण्याची हिंमत कुणी करणार नाही. संतोष बांगर यांच्या जिल्ह्यातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही", असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.