मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल यातील दरी कशी साधावी, यावर अखेर तोडगा मिळाला असून, बर्फीवाला पूल न पाडता त्याचे स्लॅब उंचावण्याची शिफारस तांत्रिक अहवालात करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्यामुळे पालिकेला नवीन कामासाठी कंत्राट काढणे कठीण असल्याने पालिका आयुक्तांनी स्वतः यामध्ये लक्ष देऊन तातडीची बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन ही प्रक्रिया करून घ्यावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून केली आहे. अंधेरी पश्चिम दिशेला असलेल्या सी. डी. बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी नवीन बांधकामामुळे वर-खाली झाली आहे. अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
त्याच कंत्राटदाराकडून काम करून घ्यावे -
१) निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेणे शक्य नसल्यास त्याच कंत्राटदाराकडून व्हीजेटीआयच्या निरीक्षणाखाली ही कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे साटम यांनी सुचविले आहे.
२) यामुळे पावसाआधी हे काम पूर्ण होऊन अंधेरीकरांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सुचविले आहे.
नवीन निविदा काढून काम -
व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांनी २० मार्च रोजी आपला अहवाल पालिका प्रशासनाला सादर केला. हे दोन्ही पूल जोडण्यासाठी बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नसल्याचे संस्थेने आपल्या अहवालात म्हटले असून, त्यासाठी नवीन निविदा काढून हे काम द्यावे लागणार आहे.