लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगावमधील म्युझिक कंपनीच्या सीईओचे बंदुकीच्या धाकात अपहरण करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज हा गुन्हा घडल्याचा आठवडाभरानंतरही अद्याप पसार आहे. अटकेत असलेल्या त्याच्या साथीदारांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली.
वनराई पोलिसांनी बुधवारी आरोपी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनीत सिंग आणि चंदन सिंग या तिघांना न्यायालयासमोर उभे केले. तेव्हा त्यांना अजून एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांना यापूर्वी १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार हे तिघे आरोपी १७ ऑगस्टपर्यंत वनराई पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांची चौकशी पोलिस करीत आहेत. दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वेचा मुलगा राज हा पसार होऊन आठ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. त्यानुसार त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राजने ९ ऑगस्ट रोजी व्यावसायिक राजकुमार सिंग यांना त्यांच्या कार्यालयातून शस्त्राच्या धाकात पळवून नेले. त्यापूर्वी सिंग यांना फोन करत आ. प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगण्यात आले होते.