भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 04:45 PM2023-09-14T16:45:00+5:302023-09-14T16:59:19+5:30
जर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केले असतील आणि आता ते म्हणत असतील की आम्हाला वेळ हवा तर ही शुद्ध फसवणूक आहे असा आरोप आमदार सुनील प्रभूंनी केला.
मुंबई – शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांची आजपासून विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांना दोन्ही गटाने कागदपत्रे दिली. त्याचसोबत २ आठवड्यांचा वेळ दिला आहे. मात्र जो काही निर्णय द्यायचा तो तात्काळ द्यावा. आम्ही जे डॉक्युमेंट दिले त्याच्या पलीकडे आम्हाला काही द्यायचे नाही तुम्ही निर्णय घ्या असं ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.
आमदार सुनील प्रभू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घ्यायला सांगितला होता. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना तत्कालीन शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून सुनील प्रभू यांच्या मान्यता दिली होती. त्यामुळे शेड्युल १० प्रमाणे जो निर्णय द्यायचा तो तात्काळ द्यावा असा युक्तिवाद आमचे वकील देवदत्त कामत यांनी केला. शेड्युल टेन प्रमाणे निर्णय घ्या असं आमच्याकडून सांगण्यात आलं. परंतु शिंदे गटाकडून वेळ काढूपणा सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत जर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केले असतील आणि आता ते म्हणत असतील की आम्हाला वेळ हवा तर ही शुद्ध फसवणूक आहे. दोन आठवड्यांची वेळ दिली आहे कागदपत्रांची अदलाबदल होईल. आमची कागदपत्रे आम्ही सादर केली आहेत. त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे. या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांची जी मूळ शिवसेना आहे त्यांनी त्यांची बाजू भक्कम मांडली आहे. भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली असा टोलाही आमदार सुनील प्रभूंनी शिंदे गटाला लगावला.
दरम्यान, लोकशाहीत सत्याचा विजय होईल. १४ आमदारांना निधी न देणे किंवा अन्य गोष्टींनी अडवणूक केली जातेय परंतु हे १४ जण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. नैसर्गिक न्यायाने हा निर्णय जर घेतला तर हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल. निर्णय या आधीच येणे अपेक्षित होते. भारतीय घटनेनुसार आणि विधिमंडळाच्या नियमानुसार या आधीच शिक्कामोर्तब केला आहे. सत्यमेव जयते असा विश्वासही ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.