Join us

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पाण्याचा पुनर्वापर आणि सोलार यंत्रणा अंमलात आणावी

By मनोहर कुंभेजकर | Published: April 16, 2023 7:46 PM

आमदार सुनील राणे यांची सूचना

मुंबई :मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर उंच उंच इमारती उभ्या रहात आहेत. भविष्यात पाण्याचे दुर्भिकक्षामुळे सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे कठीण होणार आहे. पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्धता याची सांगड कशी घालावी हा यक्षप्रश्न आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पाण्याचे रिसायकलिंग अर्थात पाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे, त्याच प्रमाणे सौर ऊर्जा (सोलार) यंत्रणा मोठ्या प्रमाणावर अंमलात आणणे नितांत गरजेचे आहे.  सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्यास आपण प्रगती साधू शकतो आणि विकास घडवू शकतो, अशा शब्दांत बोरीवलीचे आमदार सुनील दत्तात्रय राणे यांनी आपली भूमिका मांडली. 

बोरीवली पूर्व येथील कुसुमभारती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात उद्यान सुशोभीकरण व  या उद्यानात लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एका योजनेचे भूमिपूजन आमदार सुनील राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उत्तर मुंबई परिसरात येऊ घातलेल्या बहुमजली इमारती आणि पर्यायाने नवीन येऊ घातलेल्या मागण्या, पाणी आणि वीजेची मागणी व त्यांची उपलब्धता यावर प्रकाशझोत टाकला आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना यासाठी योग्य तो सल्ला देतांनाच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेविका आसावरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते शाम कदम, सीमा शिंदे, व्यंकटेश क्यासाराम, सुरेंद्र गुप्ता, नीरव मेहता, गणेश जाधव, कुसुमभारती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी शैलेश पटेल यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.  कुसुमभारती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सरचिटणीस भारत कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवश्यक असलेल्या बाबी आमदारांसमोर निदर्शनास आणल्या.

टॅग्स :मुंबई