ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:52 PM2023-03-13T15:52:30+5:302023-03-13T15:58:50+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत.
मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. सिंधुदुर्गमध्येही मोठे बदल करत आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या नियुक्तिमध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता आमदार नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी नव्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले आहेत. मी उद्धव ठाकरे यांचा प्रमाणिक कार्यकर्ता आहे. मी ठाकरे गटाला सोडून कुठेही जाणार नाही, असं स्पष्टीकरण आमदार वैभव नाईक यांनी दिलं आहे.
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले
'जिल्हा प्रमुख या पदी नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचे मीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मला सगळीकडे फिरायचे आहे. मला उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहायचे आहे. गेल्या आठ दिवसापूर्वीच हे पद दिले आहे, असंही वैभव नाईक म्हणाले.
'माझी गरज विरोधकांना आहे हे यावरु दिसून येतंय. मी नाराज नाही, दोनवेळा मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कधी नाराज झालो नाही आणि आता जिल्हा अध्यक्षपदावरुन मी का नाराज होऊ, असा सवालही आमदार नाईक यांनी केला.