मुंबई: महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना यथोचित न्याय देण्यासाठी आमदार पेातनीस यांना संघटनेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारावा, अशी एकमुखी विनंती कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यांनी आज दुपारी अध्यक्षपदाचा पदभार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात स्वीकारला.
म. प्र. नि. मंडळाच्या कर्मचाऱ्यांची ही संघटना राज्यव्यापी संघटना असून, म. प्र. नि. मंडळाच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे काम या संघटनेने गेल्या दोन दशकात केले आहे. वर्तमानात कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि निवृत्ती वेतन या प्रमुख मागण्यांवर संघटना काम करत असून, या अनुषंगाने या महत्वाच्या मागण्यांबरोबरच अन्य काही मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल,असे प्रतिपादन पदभार स्वीकारल्यानंतर विलास पोतनीस यांनी केलेे.
विलास पोतनीस यांनी पदभार स्वीकारल्या नंतर दिलेल्या सदीच्छा भेटीत त्यांचे कर्मचारी संघटनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्मचारी, प्रशासन, संस्था आणि कामकाज या महत्वाच्या बाबी असून, यांच्या समन्वयातून कर्मचाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिलासा मिळेल, असे कामकाज आपण करु, असे त्यांनी सांगितले.
संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे ( आयएएस ) यांची विलास पोतनीस यांनी सदीच्छा भेट घेतली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रविण पाटील, उपाध्यक्ष उदय मयेकर व संजय नार्वेकर,रमेश तावडे चिटणीस, सह-सचिव दत्ताराम गावकर, दिलीप मोहित, विजय म्हात्रे, चंद्रकांत धनु, खजिनदार दिनानाथ राणे, सह खजिनदार शोभना नाईक, इतर सर्व कार्यकारिणी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.