सातत्याने त्याच मार्गावरुन प्रवास; मग चालकाला अपघाताचं ठिकाण सांगता न येणं आश्चर्यकारक- ज्योती मेटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:32 PM2022-08-16T12:32:37+5:302022-08-16T12:35:01+5:30

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

MLA Vinayak Mete's wife Jyoti Mete has expressed suspicion about the accident. | सातत्याने त्याच मार्गावरुन प्रवास; मग चालकाला अपघाताचं ठिकाण सांगता न येणं आश्चर्यकारक- ज्योती मेटे

सातत्याने त्याच मार्गावरुन प्रवास; मग चालकाला अपघाताचं ठिकाण सांगता न येणं आश्चर्यकारक- ज्योती मेटे

googlenewsNext

मुंबई- शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर रसायनी (जि. रायगड) येथील अपघातात मृत्यू झाला. मेटे यांच्या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित झाल्याने त्यांच्या गाडीची धडक झालेल्य़ा ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच मला सुरुवातील विनायक मेटेंचा अपघात नेमका कुठे झाला आहे, हे कुणीही सांगत नव्हतं. चालकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तोही ठिकाण सांगू शकत नव्हता. सदर चालक गेल्या अनेक वर्षांपासून विनायक मेटेंसोबत होता. तो सातत्याने या मार्गावरुन विनायक मेटेंसोबत प्रवास करत होता. त्यामुळे त्या अपघाताचं ठिकाण सांगता येऊ न शकणं हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे मला या अपघाताबाबत संशय आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

मुंबई-पुणे द्रुतगती महामारगावरील भातण बोगद्याजवळ माजी आ. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. यासंदर्भात बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना कामोठे रुग्णालयात पहाताच समजून आले, की समथिंग इज राँग. मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते. त्यानंतर मी माझ्या भावाला सांगतिले ही घटना पाऊन तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. काही तरी आमच्यापासून लपवले जात होते. 

कदाचीत लपवले जात नसेल, परंतु मला फोन येण्याआगोदर ती घटना घडून खूप वेळ झालेला होता. मृत्यूची वेळ पीएम रिपोर्टमध्ये येईलच. अपघाताची माहिती मिळताच मी मुंबईतून तेथे पाऊन तासात कामोठे रुग्णालयात पोहोचले होते. मला कळालेली अपघाताची वेळ व प्रत्यक्ष घडलेली घटना याची चौकशी झाली पाहिजे. राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा पिंड होता. समाजकारणानेच त्यांचा बळी घेतला, असा आरोप ज्योती मेटे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिला कुटुंबाला धीर -

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शोकाकुल मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्या दोघांनी मेटे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. मेटे यांच्या निधनाने कोलमडून पडलेल्या पत्नी ज्योती, आई लोचनाबाई, मुलगा आशितोष, मुलगी आकांक्षा ,बंधू रामहरी मेटे यांचे सांत्वन केले. यावेळी शिंदे, फडणवीस यांनाही गहिवरून आले.

Web Title: MLA Vinayak Mete's wife Jyoti Mete has expressed suspicion about the accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.