शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आमदार सोडणार पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 01:12 PM2018-10-03T13:12:59+5:302018-10-03T13:35:12+5:30
सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत.
मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या विविध आमदारांनी यावेळी पेन्शनचा त्याग करत असल्याची घोषणा केली.
आमदार शशिकांत शिंदे, आमदार सिद्धराम मेहेत्रे यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित राहून मागणीला जाहीर पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा निषेधही दोन्ही आमदारांनी नोंदवला. येत्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत पेन्शन स्विकारणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. या मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या शिक्षक आमदार नागो गाणार आणि आमदार नारायण पाटील यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन सोडण्याची घोषणा केली.
हातात झाडू घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन
संघटनेचे कोषाध्यक्ष प्रवीण बडे म्हणाले की, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे अडीच लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर विरोधकांसह सेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपा एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.