...अन् आ. यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर, महिला दिनाच्या विशेष चर्चेत व्यथा ऐकून सभागृह अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 07:41 AM2023-03-09T07:41:02+5:302023-03-09T07:42:26+5:30
त्यांच्या अनुभवावर सभागृह अवाक् झाले.
मुंबई : पतीच्या निधनाला १८ वर्षे झाली, आपल्या दोन्ही मुलांची नावे वारस म्हणून लावण्यासाठी मी संघर्ष करत आहे, अशी खंत व्यक्त करताना अमरावती जिल्ह्यातील तिवसाच्या काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना बुधवारी विधानसभेत रडू कोसळले. महिला दिनानिमित्त विधानसभेवर महिला धोेरणावर त्या बोलत होत्या. एका आमदाराला, एका माजी मंत्र्याला महिला म्हणून हक्क मिळवताना अशी परवड हाेत असेल तर सामान्य महिलांचा संघर्ष किती मुष्कील आहे, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या अनुभवावर सभागृह अवाक् झाले.
महिला दिनानिमित्त इतर कामकाज बाजूला ठेवून महिला धोरणांवर सर्व महिला आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. राज्यात महिलांची कशी परवड होत आहे, याचा पाढाच ठाकूर यांनी वाचला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाचीच इथे कोंडी झाली आहे. राज्याच्या सर्व विभागांची कार्यालये चांगल्या ठिकाणी आहेत, पण, महिला आयोगाला मात्र पोटमाळ्यावर कार्यालय दिलेले आहे. मी मंत्री असताना आयोगाला कार्यालय मिळण्यासाठी बैठका घेतल्या. योगायोगाने माझ्या विभागाच्या सचिव महिलाच होत्या. तरी कार्यालयाचा प्रश्न सुटला नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. नागरी वस्तीत २ किमीवर महिलांसाठी स्वच्छतागृह हवे असे नियम आहेत. मात्र, ते प्रशासन पाळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
पुरुष आमदारांच्या तुलनेत दुय्यम वागणूक
पुरुषांपेक्षा महिलांना कमी समजले जाते. पुरुष आमदारांपेक्षा अधिक संघर्ष करून आम्ही विधानसभेत येतो. मात्र महिला आमदारांना बोलण्याची क्वचित संधी मिळते. आम्ही हात वरती करून थकतो, पण संधी मिळत नाही. महिला आमदारांना बजेटचे काय कळते, असा समज असल्याने बजेटवर आमच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत. असा दावा त्यांनी केला.
चर्चेमध्ये प्रणिती शिंदे, सरोज अहिरे, माधुरी मिसाळ, गीता जैन, ऋतुजा लटके, वर्षा गायकवाड, लता सोनवणे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर या आमदारांनी महिला धोरणांवर मते मांडली.