मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता महापालिकेच्या वेगवेगळ्या आर्थिक विषयाचे प्रस्तावासाठी अधिकाऱ्यांच्या समित्या तयार करण्यात येणार आहेत. यावरून आमदार योगेश सागर यांनी महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र लिहिले आहे. कुंपणानेच शेत खाऊ नये असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
मागील दिवसात वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे आपण यापुढे मनपाचे प्रशासक म्हणून पादर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता महापालिकेच्या वेगवेगळ्या आर्थिक विषयाचे प्रस्तावासाठी अधिकाऱ्यांच्या समित्या निर्माण करणार आहात. यापुढील अनुभवाप्रमाणे कुंपणच शेतखाते असे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सत्याधारांच्या कारभारामुळे सिद्ध झाले आहे, असे पत्रात म्हणत आमदार योगेश सागर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
याचबरोबर, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता मी आपणास असे सुचवितो की, आपण निर्माण केलेल्या समितीपुढे महापालिकेचे विविध खात्यांचे आर्थिक प्रस्ताव जेव्हा-जेव्हा छाणनीसाठी व आपल्या मंजुरीकरिता पाठविण्यात येईल असे समितीपुढील प्रस्ताव आपणास पाठविल्याबरोबरच व मंजुरीसाठी प्रस्तावित असताना असे विविध समिती समोरील आर्थिक प्रस्ताव मुंबई व उपनगरातील लोकांच्या माहितीकरिता आपण तसे प्रस्ताव महानगरपालिकेच्या संकेतस्थळांवर व महापालिकेच्या मुख्यालयाच्या सूचना फलकावर किंवा अन्य व्यवस्थेने लोकांना पाहण्यासाठी व पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता ठेवण्यात यावे जेणेकरून अनाधावनाने सुद्धा आपल्याकडून पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त प्रयत्नांची पायमल्ली होणार नाही, असेही आमदार योगेश सागर यांनी म्हटले आहे.