Zeeshan Siddique on Congress : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे देखील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसपासून लांब असलेले आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मोहब्बत की दुकान खोलनेसे कुछ नहीं होता असं म्हणत झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी यांना विशेष स्थान देण्यात आलं होतं. माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना झिशान यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच सुनावले. तसेच या कार्यक्रमात सिद्दीकी यांनी अजित पवार यांचेही कौतुक केले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा मुंबईत दाखल झाली. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व या मतदारसंघात या यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. जनसन्मान यात्रेच्या बॅनवर झिशान यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यानंतर सिद्दीकी हे अजित पवार यांच्यासोबत जनसन्मान यात्रेत सहभागी झाले. यावेळी बोलताना सिद्दीकी यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.
"२६ व्या वर्षी मी आमदार झालो. पण काम करायची संधी मिळाली तेव्हा आम्ही पुढे आलो पण आम्हाला थांबवण्यात आलं. थांबवणारे आमच्या जवळपासच आहेत. कोणी काम थांबवले हे तुम्हालाही माहिती आहे. मी माझ्या नेत्यांकडे जायचो तेव्हा ते म्हणायचे की ही मुख्यमंत्र्यांची जागा आहे आपण काही करु शकणार नाही. त्यावेळी अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर अर्थमंत्री या नात्याने ते फोन करायचे आणि तेव्हा मला मतदारसंघासाठी निधी मिळायचा. आम्हाला फक्त काम करायचं आहे. पण कोणी थांबवल्यावर त्याला उत्तरही आम्हाला देता येतं. माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. तुमचे काम घेऊन वरिष्ठांकडे जायचो तेव्हा ही मुख्यमंत्र्यांची जागा आहे सांगून काही करु नाही शकत सांगायचे. सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, दिलो मे भी मोहब्बत होनी चाहिये," असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांकडून झिशान सिद्दीकींचे कौतुक
जनसन्मान यात्रेदरम्यान, अजित पवार यांनी झिशान सिद्दीकींचे तोंडभरुन कौतुक केलं. प्रत्येकाला स्वतंत्र विचारधारा आहे. झिशान एक चांगला कार्यकर्ता आहे. उत्तम संघटक आणि तरुण आहे. सगळ्यात तरुण आमदार म्हणून तो निवडून आला. त्याचे मतदारसंघात काम आहे, असं अजित पवार म्हणाले.