माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी पाच आरोपींना अटक केली, मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी आमदार झिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले, मी आता बोलण्याच्या परिस्थित नाही, माझ्या डोक्यात बरंच काही आहे. मला सध्या माझ्या परिवाराला वेळ द्यायचा आहे. माझ्या परिवाराचे संरक्षण करायचे आहे. आता मला तुम्ही वेळ द्या, तरच मी तुम्हाला सगळी उत्तर देईन. मला उत्तर मिळाल्यानंतर मी तुम्हाला नक्की तुम्हालाही उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया आमदार झिशान सिद्दिकी यांनी दिली.
आमदार झिशान सिद्दिकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. पोलिसांनी झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकरणाच्या तपासाची माहिती दिली आहे.
याआधी गुरुवारी मुंबई पोलिसांनी मुख्य शूटर शिवकुमार गौतमसह तीन आरोपींना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट सर्कुलर जारी केले. एलओसीमध्ये नाव असलेल्या इतर दोन आरोपींमध्ये सह-कारस्थान शुभम लोणकर आणि संशयित हँडलर मोहम्मद जीशान अख्तर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली आहेत. आरोपी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून एलओसी जारी करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, परिपत्रकानुसार आरोपींना पकडण्यासाठी सर्व बंदरे आणि विमानतळांना सतर्क करण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील पॉश वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आत्तापर्यंत हरियाणातील रहिवासी गुरमेल बलजित सिंह (23), हरिशकुमार बलकराम निसाद (23) आणि सह-सूत्रधार आणि शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर, पुणे येथील रहिवासी यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे.