आमदार झिशान सिद्दीकी यांची भाई जगताप यांच्याविरुद्ध हायकमांडकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:36+5:302021-06-17T04:06:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विभागीय मुंबई काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विभागीय मुंबई काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वेतील आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह संघटन सचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील आदी नेत्यांना पत्र पाठवून तक्रारींचा पाढा वाचला आहे.
भाई जगताप यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप झिशान सिद्दिकी यांनी केला, शिवाय आपल्या विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत, घटनांची जंत्रीच मांडली आहे. अलीकडेच काँग्रेसने नागरिकांना किट वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघातील बीकेसी पोलीस स्थानकात आयोजित केला होता. त्यासाठी राज्यातील अनेक नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली. मात्र, स्थानिक आमदार असूनही आपल्याला डावलले. राजशिष्टाचाराचा हा भंग असून, आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सिद्दिकी यांनी पत्रात म्हटले आहे, तसेच भाई जगताप यांनी पक्षातील काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, सिद्दिकी यांच्यासाठी काम करणाऱ्यांना पक्षात पदे दिली जाणार नाहीत. विशेषतः अलीकडेच युवक काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ज्यांनी सिद्दिकींच्या बाजूने काम केले, त्यांना बाजूला ठेवण्याची भूमिका घेतल्याचा आरोपही झिशान यांनी हायकमांडला पाठविलेल्या पत्रात केला आहे.
*जाणीवपूर्वक कोणालाही माझ्याकडून वेगळी वागणूक दिली जात नाही - भाई जगताप
भाई जगताप यांनी सांगितले की, झिशान सिद्दिकी मुंबईतील पक्षाचे तरुण आमदार आहेत. त्याचे जितके वय आहे, त्यापेक्षा जास्त काळापासून मी राजकारणात आहे. इतका कालावधी मी फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये काढला आहे. त्यामुळे माझी कारकिर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक कोणालाही माझ्याकडून वेगळी वागणूक दिली जात नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात, प्रोटोकॉल असेल, तर तो झिशान सिद्दिकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दिकीशी चर्चा करून, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असेही भाई जगताप म्हणाले.
..................................