Join us

मला धर्मावरून बोलले, धक्काबुक्की केली; काँग्रेस आमदाराची भाई जगतापांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 2:26 PM

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं सोनिया गांधींना पत्र; जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

मुंबई: महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधीकडे तक्रार केली आहे. झिशान यांनी त्यांच्या पत्रात १४ नोव्हेंबरला काढण्यात आलेल्या रॅलीचा संदर्भ देत जगताप यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'मुंबईत १४ नोव्हेंबरला पक्षाची रॅली होती. त्यावेळी भाई जगताप यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. माझ्यासोबत धक्काबुक्की झाली. शेकडो लोकांसमोर माझा अपमान केला. पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मी त्यावेळी काहीच बोललो नाही. भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,' अशी मागणी झिशान यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे.

रविवारी मुंबई काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी आणि युवा नेते सूरज सिंह ठाकूर उपस्थित होते. यावेळा या तिघांमध्ये राजगृहात प्रवेश करण्यावरून वाद झाला. आमदार असल्यानं झिशान यांना राजगृहात जायचं होतं. मात्र त्यांना राजगृहात जाऊ दिलं गेलं नाही.

राजगृहात केवळ १० जणांनाच प्रवेश होता. तितक्याच लोकांना आत जाण्याची परवानगी होती, असं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं. या रॅलीवेळी झालेल्या कार्यक्रमात झिशान यांना व्यासपीठावर जाऊ देण्यात आलं नाही. वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असलेल्या व्यासपीठावर जात असताना रोखण्यात आल्यानं झिशान पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेले.

टॅग्स :अशोक जगतापकाँग्रेससोनिया गांधी