मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरून विधानसभेत आमदारांचे रणकंदन, नार्वेकरांनी सरकारला दिली अशी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:33 IST2025-03-22T14:32:48+5:302025-03-22T14:33:39+5:30

येत्या सोमवारी आपल्या दालनात मुंबईतील आमदारांची या विषयाबाबत बैठक होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांच्या भावना जाणून घेतील...

MLAs clash in the Assembly over the cement road scam in Mumbai, Norwegians give instructions to the government | मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरून विधानसभेत आमदारांचे रणकंदन, नार्वेकरांनी सरकारला दिली अशी सूचना

मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरून विधानसभेत आमदारांचे रणकंदन, नार्वेकरांनी सरकारला दिली अशी सूचना

मुंबई : मुंबईत रस्ते घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकामार्फत (ईओडब्ल्यू एसआयटी) करण्यात आली होती, तशीच ती सध्याच्या मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांबाबत आमदार करीत असलेल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन करता येईल का, याचा विचार राज्य सरकारने करावा, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. 

येत्या सोमवारी आपल्या दालनात मुंबईतील आमदारांची या विषयाबाबत बैठक होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांच्या भावना जाणून घेतील. त्याचवेळी एसआयटी चौकशीविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही नार्वेकर यांनी दिले. रस्त्यांच्या कामात अनियमितता असल्यास चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. 

मुंबईत ६,६३२ कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याचे मिशन एकनाथ शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना हाती घेतले होते. पण, या रस्त्यांमधील घोटाळे, कंत्राटदार कंपन्यांनी दिलेले सबकॉन्ट्रॅक्ट, त्यात महापालिका अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांचा असलेला समावेश, रस्त्यांसाठी नेमलेल्या कन्स्लटंट कंपन्यांमध्ये महापालिकेचेच निवृत्त अधिकारी असणे, आदी मुद्यांवर भाजपचे अतुल भातखळकर, अमित साटम, पराग आळवणी, योगेश सागर या सदस्यांनी सरकारला घेरले. तसेच, या रस्त्यांची कामे कमालीची रखडली असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली.

भातखळकर म्हणाले, या रस्त्यांच्या कामाचे पुन्हा ऑडिट करा, कंत्राटदारांच्या दंडाच्या रकमेत वाढ करा. अमित साटम म्हणाले, १५ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते काँक्रिटचे करावेत आणि त्या खालचे रस्ते हे ॲसफाल्ट मास्टिकचे केले, तर ते १५ दिवसांत पूर्ण होतील. 

कंत्राटदारांना रक्कम दिली
मुंबईत काँक्रिट रस्त्यांच्या कामांसाठी आगाऊ रक्कम दिली जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले होते. पण, काही कंत्राटदारांना तशी रक्कम दिल्याचे मंत्री आज सभागृहात सांगत आहेत. वस्तुस्थिती काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांच्या तसेच अन्य काही सदस्यांच्या प्रश्नांवर ‘आपण या बाबतची माहिती पटलावर ठेवू’, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिल्याने हंशा पिकला. अमित देशमुख, अमिन पटेल, मुरजी पटेल आदी सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 

गालबोट लागलेच 
आहे : राहुल नार्वेकर
मुंबईला चांगले रस्ते मिळावेत, असा उद्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्याच मतदारसंघातील काँक्रिट रस्त्यांचा पंचनामा केला. 

ते म्हणाले, की अडीच वर्षांपूर्वी माझ्या कुलाबा मतदारसंघात काँक्रिट रस्त्याची निविदा काढलेली होती. पण, काम झालेच नाही. सहा महिन्यांपूर्वी पुन्हा निविदा काढली. पण, अजून काम सुरू झालेले नाही. आधीच्या कंत्राटदारावर कुठलीच कारवाई केलेली नाही, त्यामुळे गालबोट हे लागलेले आहेच.

Web Title: MLAs clash in the Assembly over the cement road scam in Mumbai, Norwegians give instructions to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.