Join us  

काही दिवसातच ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार; शिंदे गटातील आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 3:25 PM

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांतील नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत.

मुंबई- देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांतील नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. येत्या आठ दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

 काही दिवसापूर्वी ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तर आता आणखी काही मोठे नेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमदार संतोष बांगर म्हणाले, आमच्या शिवसेनेत रवींद्र वायकर तर येणारच आहेत. त्यासह मराठवाड्यातील एक खासदार आणि कोकणातील एक आमदार शिवसेनेत येणार आहेत, असा मोठा गौप्यस्फोट आमदार बांगर यांनी केला.

"आठ ते दहा दिवसात हे नेते प्रवेश करणार आहेत. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत. सभागृहात आमच्यासोबत बोलताना बाकीचे आमदार सांगतात आम्ही तुमच्यासोबत शिंदे साहेबांसोबत गेलो असतो तर बरे झाले असते, असंही बांगर म्हणाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे आता आमच्या पक्षात अनेक नेते प्रवेश करत आहेत, असंही बांगर म्हणाले. 

आमदार रविंद्र वायकर हे खूप चांगले नेते आहेत. त्यांनी आमच्याकडे संपर्क प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना आमच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी ईडी, सीबीआय याचे काही नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम बघून आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.  अधिवेशन संपल्यानंतर चारच दिवसात ते आमच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचंही आमदार बांगर म्हणाले. आमदार रविंद्र वायकर यांना काही दिवसापूर्वी ईडीने समन्स पाठवले होते. ते चौकशीसाठीही हजर झाले होते, दरम्यान, त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट आली. मुंबई महापालिकेने चक्क दोन महिन्यातच वेगळी भूमिका घेत आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकरांनी नवा प्रस्ताव बीएमसीला दिला असून, महापालिकेने पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली होती.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे