"शिंदे गटातील आमदार नजरकैदेत; मंत्रिपद मिळालं पण अनेकांचं डिमोशन झालं"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:36 PM2022-08-17T12:36:52+5:302022-08-17T12:37:50+5:30
जे गद्दार त्यांच्यासोबत गेले त्यांचाही गेम झाला आहे. मंत्रिमंडळात खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई - आम्ही २०१९ मध्ये सत्तांतर करून देशाला नवा पर्याय दाखवला. दुर्दैवाने आमच्यातील काही जण गद्दार निघाले ज्यांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांना सगळं काही उद्धव ठाकरेंनी दिले. मात्र ज्याने दिले त्याच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं घाणेरडं राजकारण आहे. ही कधीच महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नव्हती अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना मंत्रिपदावर संधी दिली त्यांचंही डिमोशन झालं आहे. आमच्याकडे असताना बरे होते. संपर्कात अनेक जण आहे. शिंदे गटातील आमदार अडकलेले आहेत, फसलेले आहेत आणि नजरकैदेत आहेत. आता पुन्हा आमचे दरवाजे खुले आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात असेल. परंतु सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं आव्हान त्यांनी दिले.
तसेच जे गद्दार त्यांच्यासोबत गेले त्यांचाही गेम झाला आहे. मंत्रिमंडळात खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे. सत्ताधारी पक्षात अनेक काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. अपक्षांना स्थान नाही. मुंबईतील कुणाला स्थान नाही. जे १४-१५ निष्ठावंत त्यांच्यासोबत गेले होते. त्यांनाही मंत्रिपदावर स्थान नाही. निष्ठेला त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू
हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत असा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले. 'स्थगिती सरकार हाय हाय' अशा घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली.